Pages

चंद्राच्या स्वप्नांना
अलिकडे कटाक्षाने वगळते मी
ओथंबलेल्या रात्रीतून
-चंद्रही कधी परका होईल
कुणास ठाऊक!

* * *

तुझ्या डोळ्यात पाहिलेल्या
चांदण्या रात्री अगणित आहेत,
याची जाणिव विरली नसली तरी
स्मरणात मात्र
एक अमावस्याचं रुतलीय!

* * *

चंद्राचे केशर आणि
लाटांचे सूर
असेच गुरफटले होते एकमेकांत
तेव्हाही---
पण आभाळ मात्र
तारकांनी खचलेले होते!!

* * *

सायंकाळच्या तिरप्या किरणांत चमकणारी
दूरदूरपर्यंत धावणारी
छोटीशी पायवाट---
लाल मातीची!

नजरेच्या पार टोकाला
तिला मिळालेला छोटासा वळसा---

आणि पलीकडे
सगळा Transfer Scene !

तू नसताना
आठवणींचे मेघ दाटून येतात आभाळभर
ओथंबून आलेलं हे अस्मानी स्वप्न
छळत राहत मनाला क्षण न‌ क्षण

तू आल्यावर
बरसतात हेच मेघ धुंद हो‌ऊन
भरभरुन कोसळणाऱ्या या आनंदसरींत
चिंब चिंब नाहतं आसावलेलं मन

आणि तू गेल्यावर---
सुरु होतो श्रावणाचा खेळ
अनंतकाळ चालणारा---!


अनंतातल्या कुठल्यातरी,
घननिळ वळणावर
अंकुरत असेल तुझी साद;

आभाळ भरून कोसळणाया
एकाकी तिमिरांत
आश्वासत असतील तुझे हात;

एकांतातल्या गर्दीत,
गर्दीतल्या एकांतात
थरथरत असेल तुझा श्वास;

ह्या विश्वासावर,
भोवतालचा कोलाहल
सुसह्य करतेय मी---!


पाऊस नवे गाणे
पाऊस जुने तराणे
पाऊस फक्त बहाणे
सावळ्याला भेटण्याचे

पाऊस त्याची आस
पाऊस त्याचेच भास
पाऊस पदन्यास
सावळ्याच्या पावलांचा

पाऊस घननीळ स्मरणी
पाऊस मीरेची झुरणी
पाऊस तृप्त धरणी
सावळ्याच्या वर्षावात


सावटीत जरी
फुलली ही स्वप्ने
प्रकाशाचे वेध
त्यांना आता

पागोळीचे जरी
ठिबकले थेंब
सागराचे वेध

त्यांना आता

इवलेसे जरी
शिशिरांत कोंब
जीवनाचे वेध
त्यांना आता

सुकली जरी ही
बकुळीची फुले
मिलनाचे वेध

त्यांना आता



सावळ्याचा ऋतू आला
अवघी सृष्टीच बासुरी

कळीकळीतून राधा
झाली मोहन बावरी

सावळ्याचा ऋतू आला

वेली श्रृंगारात दंग

थेंबाथेंबातले गाणे

म्हणे गोविंद गोविंद


सावळ्याचा ऋतू आला

वारा पिसाट उनाड

चिरा एकेक निखळे

ढळे जुन्याचा पहाड


सावळ्याचा ऋतू आला

क्षितिजरेखा धूसर

रंग-गंधि लसलसे

नवा कोवळा आकार


सावळ्याचा ऋतू आला

शाल हिरवी लेवून

घननिळ सृष्टी झाली

काळे जहर पिऊन


सावळ्याचा ऋतू आला

तृप्तीला ग सुटे गंध

काळ्याशार डोहालाही

जडे हिरव्याचा छंद!